Pune : कोंढवा पोलिसांकडून ‘मेडिकल’ फोडणार्‍या तडीपार गुंडासह दोघांना अटक; 3 गुन्हे उघडकीस तर 2 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मेडिकल दुकानांचा धंदा जास्त होत असल्याने तेथे जास्त घबाड मिळण्याची शक्यता गृहीत धरुन दुकाने फोडणार्‍या तडीपार गुंडासह दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

तडीपार गुंड सुरज ऊर्फ पाप्या रमेश जाधव (वय २१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) आणि त्याचा साथीदार रोहन सुभाष गायकवाड (वय २२, रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली केली कोंढव्यातील मेडिकलची दुकाने फोडण्यात तडीपार गुंड सुरज जाधव याचा हात आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

सुरज जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला खडक पोलिसांनी तडीपार केले आहे. असे असतानाही त्याने कोंढव्यातील दोन मेडिकल व एक फोटाग्राफरचे दुकान फोडले होते. या तीन गुन्ह्यातील चोरीस गेलेले १ लाख ३२ हजार ८०० रुपये व ७० हजार रुपयांचा कॅमेरा असा २ लाख २ हजार ८०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलिसनामा ला सांगितले की सध्या लॉकडाऊनमध्ये इतर दुकाने बंद आहेत. मात्र, मेडिकल दुकाने चालू आहेत. तसेच कोरोना महामारीमुळे मेडिकल दुकानाचा व्यवसायही चांगला चालला आहे. त्यामुळे तेथे अधिक पैसा मिळेल, म्हणून त्यांनी सेंट्रल लॉक नसलेल्या मेडिकलची दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, अंमलदार रमेश गरुड, पृथ्वीराज पांडुळे, अभिजित रत्नपारखी, सुशिल धिवार यांनी केली आहे.