Pune : रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात येण्यापुर्वीच खाजगी मिळकतींच्या भिंती रात्रीच्यावेळी जमीनदोस्त, नागरिक संतप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  औंध येथील बाणेर फाटा ते परिहार चौकादरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी रात्रीच्यावेळी सहा मिळकतींच्या सिमाभिंती पाडण्यात आल्याने स्थानीक नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष असे की दोनच दिवसांपुर्वी महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने रस्ता रुंदीचे काम करणार्‍या स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओंना पत्र पाठवून स्थानीक नगरसेविका अर्चना मुसळे या ताब्यात न आलेल्या जागांच्या सिमाभिंती रात्रीच्यावेळी परस्पर तोडून जागेवर काम करण्यास आग्रही असल्याचे कळविल्यानंतरही या भिंती पाडल्याने खळबळ उडाली आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बाणेर फाटा ते परिहार चौक (आयटीआय रस्ता) या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा २४ मी. डी.पी. रस्ता आहे. या रस्त्याचे काही काम झाले असून उर्वरीत काम जागा ताब्यात नसल्याने रखडले आहे. दरम्यान, ९ ऑक्टोबरला महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सीईओ, स्थानीक नगरसेविका अर्चना मुसळे यांनी येथे जागा पाहाणी केली होती. यावेळी पुढील काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नगरसेविका मुसळे यांना दिले होते.

रस्तारुंदीसाठी खाजगी मालकिच्या जागा तडजोडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेने सुरूही केली आहे. यापैकी बहुतांश जागा मालकांनी जागा ताब्यात देण्यास सहमतीही दर्शविली आहे. परंतू आणखी काही जागा ताब्यात आलेल्या नाहीत. ताब्यात न आलेल्या जागांच्या सिमाभिंती रात्रीच्यावेळी तोडून तातडीने हा रस्ता करण्यासाठी स्थानीक नगरसेविका मुसळे या आग्रही होत्या. परंतू सर्व जागा ताब्यात आल्यानंतरच रस्त्याचे काम करणे योग्य होईल.

जागा महापालिकेच्या ताब्यात न घेता परस्पर रस्त्याचे काम केल्यास मालमत्ता व व्यवस्थापन विभाग त्यास जबाबदार असणार नाही. तसेच याबाबत भविष्यात काही न्यायालयीन प्रकरण उदभवल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननची राहील, असे पत्र मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दोनच दिवसांपुर्वी अर्थात २१ ऑक्टोबरला स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओंना दिले आहे.

यानंतरही अगदी दुसर्‍याच दिवशी रात्रीच्यावेळी येथील सहा मिळकतींच्या सीमाभिंती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अथवा महापालिकेच्यावतीने जागा मालकांना काहीच कळविण्यात आले नाही. हे पाडकाम करताना येथील पाण्याच्या तसेच विजेच्या लाईन्सही तुटल्या आहेत. यामुळे येथील नागरिक संतप्त झाले असून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती एका नागरिकाने दिली.

स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने बाणेर फाटा ते परिहार चौकादरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. येथील भूसंपादनासाठी महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने संबधित नागरिकांना नोटीसेस दिल्या आहेत. भिंती कोणी पाडल्या याबाबत माहीती नाही. –

मधुकर मुसळे ( सामाजिक कार्यकर्ते व नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पति )