Pune : स्वारगेट पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त ! चौघांकडून 11 पिस्तूलांसह 31 जिवंत काडतूसे हस्तगत, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    खुनाच्या प्रयत्नातील फरार असलेल्या आरोपीकडून आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून स्वारगेट पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी तब्बल 11 पिस्तूल आणि 31 जिवंत काडतुसे असा एकुण 4 लाख 55 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती प्रभारी सह आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर आणि झोन-2 चे उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

बारक्या उर्फ प्रमोद श्रीकांत पारसे (19, ह.मु. क्विन्स् रेसिडेन्सी शेजारी, जिजामाता चौक, आंबेगाव पठार, पुणे), राजु अशोक जाधव (20, रा. माणगाव, ता. हवेली), बल्लुसिंग करतारसिंग शिकलीगर (49, रा. निमखेडी, जि. बुलढाणा), लादेन उर्फ सोहेल मोदीन आसंगी (24, रा. टेल्को कॉलनी, कात्रज), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, प्रभारी सह आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर आयुक्त संजय शिंदे, झोन-2 चे उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, तपास पथकाचे उपनिरीक्षक सुरेश जायभाय, कर्मचारी महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरूण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश कांटे, भुषण उंडे, बाबासाहेब शिंदे आणि शंकर गायकवाड यांच्या पथकाने अटक केली.


वानवडी परिसरात काही दिवसांपुर्वी वाळु सप्लायरवर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्या गुन्हयातील आरोपींना अग्नीशस्त्र पुरविणारा आणि सध्या फरार असलेल्या आरोपी बारक्या उर्फ प्रमोद हा स्वारगेट येथील पीएमपीएमएल बसस्टॉपवर मित्राची वाट पहात थांबला असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचुन बारक्या उर्फ प्रमोदला अटक केली. त्याच्याकडून 2 गावठी पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. पोलिस पथकाने त्यांना अटक केली. प्रत्येकाकडून अग्नीशस्त्रे जप्त करण्यात आली.

आरोपी लादेनने वेल्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपींना हत्यारे पुरविली होती. त्याच्याकडून देखील अग्नीशस्त्रे हस्तगत करण्यात आली. स्वारगेट पोलिसांनी चारही आरोपींकडून एकूण 11 पिस्तुले आणि तब्बल 31 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. अटक आरोपींनी आणखी कोणाला अग्नीशस्त्रे पुरविली आहेत काय याबाबतचा सखोल तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय करीत आहेत.