Pune : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण अ‍ॅप्लिकेशनचा (होम आयसोलेशन अ‍ॅप) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ; जाणून घ्या App ची वैशिष्ट्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण अ‍ॅप्लिकेशन (होम आयसोलेशन अ‍ॅप) चा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) मध्ये झाला.. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,

खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी मंत्री तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गृह विलगिकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या वापरासाठी व त्यांच्या आरोग्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या ऍपचा निश्चित चांगला उपयोग होणार असून गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या तब्येतीवर आरोग्य विभागाला लक्ष ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.

अ‍ॅप ची वैशिष्ट्ये

ताप, पल्स, ऑक्सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः अ‍ॅपद्वारे साध्या क्लिक द्वारे करू शकतो.

स्वतः च्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो, जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचेल. तसेच रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल.

या अ‍ॅपच्या प्रभागनिहाय डॅशबोर्डवर तसेच मुख्यालयातील वॉररूम मध्ये एकत्रित डॅशबोर्डवर ऑक्सिजन, ताप इत्यादी सारख्या रुग्णाच्या लक्षणांवर व आरोग्याच्या स्थितीवर निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ज्या रुग्णांकडे स्मार्टफोन नाही, त्यांचे आप्तजन आरोग्य विषयक माहिती पाठवू शकतात.