Pune : JCB मशीनचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास LCB कडून अटक

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –   शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत जेसीबी मशीन चे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे जेसीबी ब्रेकर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांनकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्या होत्या.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा महादेव अंबादास शेळके (रा. आवळवाडी मोरे वाडा वाघोली,ता. हवेली, जिल्हा. पुणे) यांनी केला असल्याची गोपनीय बातमी दाराकडून माहिती मिळाल्याने आरोपी महादेव अंबादास शेळके यास लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे,पोलिस कॉन्स्टेबल ऋषिकेश व्यवहारे यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याने दिनांक 23 /3 /2019 रोजी लोणीकंद हद्दीतून अशाच प्रकारचे जेसीबी मशीनचे आणखीन एक ब्रेकर चोरी करून नेल्याची कबुली दिली आहे.सदर आरोपीकडून गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली जेसीबी मशीन ,सणसवाडी इथून चोरलेले जेसीबी मशीनची ब्रेकर , लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीतून चोरलेले जेसीबी मशीन ब्रेकर असा एकूण 27,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हा तपास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मोहिते यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे,सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर,पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर,पोलिस हवालदार जनार्दन शेळके,पोलिस नाईक राजू मोमीन, अजित भुजबळ,मंगेश थिगळे,अक्षय जावळे यांनी केली आहे.