कारचा पाठलाग करून देशी-विदेशी दारूसाठा जप्त, पुणे ग्रामीणच्या LCB कडून 6 लाखाचा माल हस्तगत

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत उरुळीकांचन-जेजूरी मार्गावर शिंदवणे गावच्या हद्दीत बेकायदेशीर बिगरपरवाना देशीविदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या कारचा पाठलाग करून वाहन चालकास ताब्यात घेवून त्याचेकडून देशी वि देशी दारू व कारसह एकूण रुपये ६,३९,३०४/- चा मुद्देमाल जप्त करून कारवाई केल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अक्षय जावळे यांचे पथक मंगळवार दिनांक १७ मार्च २०२० रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत उरुळी कांचन येथे पेट्रोलिंग करीत होते. पथकातील पोलीस कर्मचारी महेश गायकवाड व निलेश कदम यांना उरुळीकांचन-जेजूरी रोडने एक लाल रंगाचे मारुती बलेनो कार नंबर नंबर एमएच १२ पी.एन. ५२६० मधुन देशीविदेशी दारूचा साठा बेकायदेशीर विक्रीसाठी जाणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने उरुळीकांचन-जेजूरी रोडवर वळती फाटा येथे सापळा रचून उरुळीकांचन बाजूकडून शिंदवणे बाजूकडे जाणारे सदर लाल रंगाचे मारूती बलेनो कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती कार न थांबता भरधाव वेगात गेल्याने तात्काळ तिचा पाठलाग करून शिंदवणे येथे हॉटेल धनराज समोर आडवून वाहन चालक राहूल उमाकांत मांढरे (वय २८ वर्षे, रा.मांजरी फार्म ता.हवेली जि.पुणे) यास ताब्यात घेवून त्याचे कडील कारची झडती घेतली असता कारचे मागील डिकीत लपवून ठेवलेला बेकायदा, बिगरपरवाना विक्रीसाठी चालविलेला देशी विदेशी दारूचा किंमत रुपये ३९,३०४/- चा साठा कारसह एकूण किंमत ६,३९,३०४/- (सहा लाख एकोणचाळीस हजार तीनशे चार) रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे.

या कारवाई नंतर वाहन चालक व मुद्देमाल लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून चालकाविरूध्द मुंबई दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा दारूसाठा कोठून खरेदी केला? त्याची कोठे विक्री करणार होता? तसेच हा माल बनावट आहे का? याबाबतचा पुढील अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन करीत आहे.