सराईत गुन्हेगार LCB कडून गजाआड

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन –  सात महिन्यापूर्वी माजी सैनिकास लुटमार करुन फरारी असलेला रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार मयुर मोडक यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ रोजी सूर्यकांत संभाजी पाटील (माजी सैनिक) रा.धनकवडी पुणे हे त्यांच्या वाहनातून गावावरुन पुण्याला जात असताना सासवड-पुणे मार्गावर उरुळीदेवाची येथे रात्री १२.३० वा.चे सुमारास सहयाद्री हॉटेलसमोर त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने ते थांबले त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना मदत करण्याचा बहाणा करून मोटरसायकलवर बसवून अंधारात घेवून जावून १० तोळे सोन्याची चैन व मोबाईल असा सुमारे दोन लाख रुपयाचा ऐवज पळवला होता.

मोटरसायकलचे नंबरवरून निष्पन्न झालेली नावे सुमीत उर्फ चिक्या राजू सोनटक्के व मयुर उत्तम मोडक दोघे रा.वडकी यांचे विरूध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.दोघापैकी सुमीत उर्फ चिक्या राजू सोनटक्के वय २१ वर्षे यास अटक करण्यात आलेली होती परंतु मयुर मोडक हा तेव्हापासून पोलीस कारवाईचे भितीने फरार झालेला होता. यातील मयुर उत्तम मोडक वय २९ वर्षे रा. वडकी ता.हवेली जि.पुणे यांचेविरूध्द यापूर्वी लोणीकाळभोर व हडपसर पोलीस स्टेशनला जबरी चोरी, खंडणी व मारहाण असे गंभीर प्रकारचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले होते या पथकातील रामेश्वर धोंडगे, सहा.पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, महेश गायकवाड, निलेश कदम, विद्याधर निचित, दत्तात्रय तांबे, सचिन गायकवाड लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीत संचारबंदी अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना एका बातमीदाराकडून मयूर मोडक हा वडकी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मयुर मोडक यास सापळा रचून फुरसुंगी रोड वडकी येथून ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक लोखंडे हे करीत आहे