दौंडमधून वर्षभरापुर्वी ट्रक चोरणार्‍याला पुणे ग्रामीणच्या LCB कडून अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) –  दौंड येथील तहसील कचेरीच्या आवारामधून १ वर्षांपूर्वी चोरलेला ट्रक आरोपीसह पकडण्यात पुणे ग्रामीणच्या एलसीबी शाखेला यश आले असून यावेळी चोरलेल्या ट्रक वाळूसह ताब्यात घेवून पाच लाख २१ हजार रुपयाचा माल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी पहाटे ०४.०० वा. चे सुमारास दौंड तहसिल कार्यालयाचे आवारातून हा ट्रक चोरण्यात आला होता. तहसिलदारांनी हा वाळूने भरलेला ट्रक नंबर एम.एच.१२ एन.एक्स. ७५७८ किं.रु. ५,२१,०००/- जप्त केला होता. कोणीतरी अज्ञात दोन इसमांनी हा ट्रक दौंड तहसिल कार्यालय आवारात अनधिकृतपणे प्रवेश करून गेटचे कुलूप तोडून चोरून नेलेला होता. त्याबाबत गाव कामगार तलाठी मिलींद आडसुळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशनला ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, रौफ इनामदार हे करीत असताना त्यांचे पथकाला सदर गुन्हयातील ट्रक हा उरुळी कांचन ते लोणी काळभोर परिसरात असलेची खात्रीपूर्वक माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरील पथकाने आरोपी मारुती तुकाराम कुंजीर वय ३३ वर्षे रा.कुंजीरवाडी, माळवाडी ता. हवेली जि.पुणे यास त्याच्या ताब्यात असणाऱ्या चोरीच्या ट्रकसह कुंजीरवाडी येथून ताब्यात घेवून गुन्ह्यातील ५,२१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यात घेतलेला आरोपी व मुद्देमाल दौंड पोलीस स्टेशनला हजर केलेला असून पुढील अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार भाकरे हे करीत आहेत. आरोपीने गुन्ह्यात चोरलेला ट्रक हा पोलीसांना ओळखू येऊ नये म्हणून त्याचा रंग बदलून ट्रकच्या नंबर प्लेटवर मातीचा चिखल लावून तो वापरत होता.

Visit : Policenama.com