पुणे ग्रामीण पोलिसांच्या LCB कडून गांजाची तस्करी करणार्‍या चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी परिसरात गांजा तस्करी करणार्‍या टोळीतील दोघांना पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 6 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
सचिन नरसिंग शिंदे (वय 32, रा. रिहे, ता.मुळशी), संगीता विष्णू जाधव (वय 45, रा. सूर्या लॉन्स समोर, माळशिरस, ता.पुरंदर), विष्णू किसन जाधव (रा.माळशिरस, ता.पुरंदर) आणि राजेश चव्हाण (रा.खोपोली, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबतच पाहिजे आरोपी आणि सराईतांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सासवड-यवत रोडने एक मोटारसायकल व स्विफ्ट गाडीमध्ये अज्ञात इसम गांजाची वाहतुक करीत आहेत. त्यानुसार, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून अटक केली.

त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यात 6 किलो गांजा मिळाला आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असून, त्यांनी हा गांजा कोठून आणला. तसेच, तो कोणाला देणार होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, त्यांचे दोन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.