पुणे : महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व कुटुंबिय करणार ‘प्लाझ्मा’ दान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनातून बरे झालेल्या महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोना बाधित गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा अर्थात रक्तद्राव देणार आहेत. कोरोना लढ्यात सकारात्मक पाउल टाकणार्‍या धुमाळ यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून अन्य कोरोना बाधितांनीही गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.

दिपाली धुमाळ त्यांचे पती प्रदीप आणि मुलगा मनीष धुमाळ यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचारानंतर ते बरेही झाले आहेत. नुकतेच विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोरोना बाधित गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही प्लाझ्मा दान करणार असून तसे पत्रही प्रशासनाला दिले आहे, असे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

दिपाली धुमाळ म्हणाल्या, की कोरोनावर सध्या कुठलेही औषध नाही. परंतू कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या प्लाझा चा उपयोग गंभीर कोरोना बाधित रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होत असल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन केले जात आहे. प्लाझ्मा दान करणार्‍या व्यक्तीला कोणताही धोका नाही. परंतू एका व्यक्तीच्या प्लाझ्मा पासून दोन जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोना बाधित व्यक्तिंनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहही धुमाळ यांनी केले आहे.