Pune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण ! महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात तक्रारीची माहिती देण्यास आलेल्या एका तरुणीला महिला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणात पोलीस उपायुक्तांनी महिला कर्मचाऱ्याचे पोलीस खात्यातून निलंबन केले आहे. यापूर्वी देखील या महिला कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले होते.

ज्योती कुतवळ (बक्कल. नं. 8081) असे निलंबन करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुतवळ या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांची नेमणूक सेवा अँपला होती. त्यावेळी एक तक्रारदार तरुणी आणि तिची आई मिसिंगबाबत दाखल असणाऱ्या तक्राराची माहिती देण्यास आल्या होत्या.  त्यांनी संशयित नंबर त्यांना माहीत असून ते घ्या असे सांगितले. पण कुतवळ यांनी “आईला सर्व माहिती आहे. तुम्ही लपवता, आज संडे आहे” तुम्ही उद्या या. आज पण डोके खाणार आणि उद्या पण डोके खाणार” असे म्हणत त्यांना परत पाठविण्याचा प्रयत्न केला. पण तरुणी तपास कोणाकडे आहे त्यांचा नंबर द्या असे म्हणाली. त्यावेळी कुतवळ यांनी अपशब्द वापरत त्यांना मारहाण केली. तरुणीची आई मध्ये आली असता त्यांना देखील धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याबाबत तरुणीने तक्रार केल्यानंतर याची चौकशी झाली. यात हा प्रकार दिसून आल्याने कुतवळ यांना पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी पोलीस खात्यातून निलंबित केले आहे. दरम्यान यापूर्वी देखील कुतवळ यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याना अपशब्द वापरले होते.