Pune : महापालिकेच्या कामांत ‘गोलमाल’ करणार्‍या ‘त्या’ अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करावी; शिवसेना आणि कॉंग्रेसची मागणी

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना सारख्या महामारीसाठी निधी नसताना महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीमध्ये गोलमाल करून विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. या प्रकरणांची सनदी लेखापालांमार्फत चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

महापालिकेचे आर्थिक वर्ष संपताना मार्चमध्ये करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गोलमाल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या कामांची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या दक्षता पथकाने कामांसंदर्भात दिलेल्या अहवालावरून महापालिका आयुक्तांनी एक झोनल उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, तीन कार्यकारी अभियंता यांच्यासह ११ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात शहर शिवसेनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देत आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले आहे. त्याचवेळी दर्जाहीन कामे करणारे, कामे न करताच बिले काढणारे तसेच चुकीचे मोजमाप करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणार्‍यांना पाठीशी घालू नये. मागील चार वर्षांत केलेल्या कामांची तपासणी करुन सर्व भ्रष्टाचार खणून काढावा. या कामांचे ऑडीट करण्यासाठी नियुक्त केलेल्या थर्ड पार्टी एजन्सींचीही चौकशी करावी. या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांची सनदी लेखापालांमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, श्याम देशपांडे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी हे निवेदन दिले.

प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनीही महापालिका आयुक्तांना निवेदन देत महापालिकेच्या निविदेप्रमाणे काम न करताच मोठ्या प्रमाणावर बिले अदा करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामध्ये थर्डपार्टी इन्स्पेक्शन करणार्‍या संस्थां तसेच अधिकारीही कामांची पाहाणी न करताच फाईलवर स्वाक्षर्‍या करत आहेत. यामध्ये ठेकेदारांसोबतच हे अधिकारीही दोषी आहेत. मागील चार वर्षात अशाच पद्धतीने सुमारे एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कामे न करताच बिले घेणार्‍या ठेकेदारांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.