ताम्हाणे वस्ती येथील दरोड्यातील आणखी एक दरोडेखोर गजाआड

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – थेऊरफाटा येथील ताम्हाणे वस्ती येथे ऑक्टोबर 2019 मध्ये घालण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील हवा असलेला तिसरा दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला असून त्याला पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील ताम्हाणेवस्तीमध्ये दि 19 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यात गणेश ताम्हाणे व त्यांची पत्नी वर्षा ताम्हाणे याच्यावर घातक शस्त्राने प्रहार करण्यात आले. यात हे दांपत्य गंभीर जखमी झाले. वस्तीवर आरडाओरडा झाल्याने दरोडेखोर पळून गेले. यातील वर्षा ताम्हाणे यांचे उपचारा दरम्यान दि 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य वाढले. यावर तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले यात सहाय्यक पोलिस दत्तात्रय गुंड, पोलिस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजपुरे ज्ञानेश्वर क्षितिजावर यांचा समावेश होता.

या गुन्ह्यातील तिसरा अरोपी बाबुशा उर्फ शुभम चिंगळ्या काळे (रा.वांगदरी, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) हा काष्टीरोडने दौंड येथे येणार असल्याचे समजले. यावर या पथकाने वेषांतर करुन सापळा रचला. रस्त्यावर पाठलाग करत त्याला जेरबंद केले व पुढील तपास करण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यातील इतर गुन्हेगार यापूर्वीच गुन्हे शाखेने जेरबंद केले असून एक अरोपी फरार होता त्यास आज ताब्यात घेतले.

थेऊरफाटा येथील हा दरोडा अत्यंत क्रूर व गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिशय गंभीर दखल घेऊन सहाय्यक पोलिस अधीक्षक विवेक पाटील तसेच जयंत मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने ही कामगिरी केली.