घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सोलापुरातील टोळी लोणीकंद पोलिसांकडून अटकेत

वाघोली : पोलिसनामा ऑनलाइन ( कल्याण साबळे पाटील) – पुणे व सोलापूर जिल्ह्यामध्ये घरफोडी व वाहनांची चोरी करणाऱ्या सोलापुरातील टोळीचा लोणीकंद पोलिसांच्या डी.बी. पथकाने पर्दाफाश केला. टोळीतील अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या ९ दुचाक्या व एक सँट्रो कार, ५८ ग्रॅम सोने, १०५ ग्रॅम चांदी, २ एलईडी टीव्ही, ४ डिस्क टायर असा एकूण साडे सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

बंडू उर्फ बंड्या मधुकर पवार (रा. डोमपाबळगाव, सोलापूर) असे घरफोडीच्या टोळीतील पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यास १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार लोणीकंद पोलिसांचे डीबी पथक आव्हाळवाडी, मांजरी खुर्द गावाच्या हद्दीवर पेट्रोलिंग करीत असताना बंडू पवार हा संशयास्पदरित्या दिसला. पोलिसांना पाहून त्याने उसाच्या शेतात पळ काढला. पोलिसांनी गावातील नागरिकांच्या मदतीने पवार यास पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, एक महिन्यापूर्वी पिंपरी सांडस येथे घरफोडी करून एलईडी टीव्ही, मोबाईल, भांडी चोरल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे त्याच्याकडे असणारी असणारी दुचाकी लोणीकाळभोर येथून चोरली असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बंडू पवार याच्या टोळीने पुणे जिल्ह्यामध्ये लोणीकंद, लोणीकाळभोर, यवत, रांजणगाव, वडगाव निंबाळकर, दौंड, हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील ९ घरफोडीचे व ९ दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे तर सोलापूर जिल्ह्यातील ९ घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. आणखी एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली असून इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. घरफोड्या केल्याप्रकरणी पर्दाफाश केलेल्या चोरीच्या टोळीतील सदस्य जिल्ह्यातील विविध ठिकाणी वास्तव्य करून चोरी करीत होती. एका परिसरामध्ये एक महिना किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी भाडयाच्या रूममध्ये वास्तव्य करून रेकी व चोरी करीत होते.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, मोहन अवघडे, श्रीमंत होनमाने, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, दत्ता काळे, प्रफुल्ल सुतार, सुरज वळेकर यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/