Pune News : महामेट्रोची मोठी घोषणा ! आता मेट्रोमधून सायकलसह करता येणार प्रवास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मेट्रोसंदर्भात सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता सायकलप्रेमींनाही सायकल घेऊन मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. खास बात अशी की, सायकलसाठी कोणतेही आगाऊ पैसे आकारले जाणार नाहीत. सर्व वयोगटातील लोक आपली सायकल घेऊन मेट्रोनं प्रवास करू शकणार आहेत. महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ते म्हणाले, नागपूरमध्ये सध्या सायकलप्रेमींसह विद्यार्थ्यांना सायकलसह मेट्रोमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विद्यार्थी, नोकरदार, महिला, अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींना आणि सायकलप्रेमींना मेट्रोमधून सायकल घेऊन प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी वाढीव शुल्क आकारलं जाणार नाही, अशी माहितीदेखील महामेट्रोनं दिली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात पुणेकरांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

अनेक विद्यार्थी, नोकर आणि सामान्य माणसे असे आहेत जे वाहनाऐवजी सायकलचा जास्त वापर करतात. अशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळं या लोकांच्या सायकल चालवण्याच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितलं आहे.