ट्रकच्या धडकेत महामेट्रोच्या कंत्राटी वॉर्डनचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव ट्रक ने दिलेल्या धडकेत मेट्रो प्रकल्पासाठी वाहतूक नियमन (मार्शल) करणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तो पगार घेण्यासाठी आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला आहे, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यानी सांगितले. सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास आरटीओकडून पंचतारांकित हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली.

सिध्दार्थ उर्फ राजू पांडुरंग कांबळे (वय ४० रा. मंगळवार पेठ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. डंपर चालक दिगंबर सखाराम ताडीकोटे (वय ५० रा. कात्रज) याला अटक केली आहे. विनोद शेंडगे (वय ३४, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी सिद्धार्थ कांबळे आणि विनोद शेंडगे हे दोघे मार्शल म्हणून काम करीत होते. त्यांच्याकडे परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासह मेट्रोच्या साहित्यावर देखरेख करण्याची जबाबदारी होती. आज सकाळी कांबळे आणि शेंडगे दोघे कामाचा पगार घेण्यासाठी आरटीओ चौक परिसरात आले होते. त्यावेळी एसएसपीएमएस कॉलेज प्रवेशव्दाराजवळ कैलाश स्मशानभूमीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कांबळे उभे होते. यावेळी आरटीओ चौकातून आलेल्या भरधाव वेगातील डंपरने कांबळे यांना चिरडले. डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

वाहतूक कोंडी सोडविणार कोण
आरटीओ कार्यालयापासून पुणे स्टेशनच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. परिणामी रस्ते अरुंद झाले असून या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. घाईगडबडीत वाहने चालविणाऱ्यामुळे परिसरात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.