महापौर चषक 2018-19 : विजेत्यांना अद्याप बक्षिसाची रक्कम नाही, पंचांचे मानधनही थकबाकीमध्येच

पुणे (शिवाजीनगर) : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्यावतीने मागील आर्थिक वर्षात अर्थात २०१८-१९ या वर्षी पार पडलेल्या महापौर चषक स्पर्धेतील विविध खेळातील काही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम अद्याप दिली गेली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. यासोबतच पंचांचे मानधन, मैदान तयार करण्याचा खर्च तसेच चित्रीकरणाचीही बिले अशी सुमारे १२ लाख रुपयांची रक्कम अद्याप दिली नसल्याचे समोर आले आहे.

महापौर चषक २०१८-१९ अंतर्गत मागील वर्षी शहराच्या विविध भागांमध्ये विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांना एक वर्ष उलटले असून सध्या २०१९-२० या वर्षीच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. परंतू यानंतरही मागील वर्षी झालेल्या स्पर्धेतील खेळाडूंना अद्याप बक्षिसाची पूर्ण रक्कम मिळालेली नाही. यामध्ये विशेषत: ज्युदो खेळातील विजेत्यांचा समावेश आहे. यासोबतच क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धेतील पंचांनाही अर्धेच मानधन मिळालेले आहे. कबड्डी खेळाडूंना जाहीर केल्याप्रमाणे प्रवासभत्ता दिलाच गेला नाही, दुसरीकडे मैदान तयार करण्याच्या खर्चातील काही रक्कम देणे अद्याप बाकी आहे. यासोबतच या स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या चित्रिकरणाचे बिलही अद्याप अदा करण्यात आलेले नाही.

महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे क्रीडा क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, ही रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.