पिंपरीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने Facebook वर बनावट अकाऊंट, यूजर्सकडे मागितले पैसे
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करुन लोकांकडून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे माझ्या नावाने अशा प्रकारे पैसे मागण्याचे मेसेज आल्यास, त्याला प्रतिसाद देऊ नका, तसेच अशा बनावट अकाऊंटपासून सावध रहावे असे आवाहन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.
फेसबुकवर बनावट खाते तयार करु किंवा आहे त्या खात्यामधील फ्रेंड्सना परस्पर पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवले जात आहात. अनेक लोकांना अशा प्रकारचे मेसेज पाठवून फसवणूक झाली आहे. अशा प्रकारची फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी अर्ज पोलिसांच्या सायबर सेलकडे रोज येत असतात. यामध्ये भर म्हणून आता खुद्द पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावानेच बनावट फेसबुक खाते उघडून त्याद्वारे पैसे मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर गुन्ह्येगारीचा फटका खुद्द पोलीस आयुक्तांनाच बसल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
फसवणूक करणारे भामटे विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींचे फॅन्स यांच्या नावाने अशा प्रकारचे उद्योग करत असतात. सेलिब्रिटींचे फोटो आणि नाव वापरून फसवणूक केल्याच्या घटना यापूर्वी देखील उघडकीस आले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावानेही फेसबूकवर अनेक अकाऊंट आहेत. त्यातील कोणती खरी आणि कोणती खोटी हे ओळखणे सामान्य नागरिकांना अवघड आहे.
नागरिकांना सर्व प्रकारे संपर्क साधता यावा तसेच एकदा मुद्दा माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक अधिकारी सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र, सध्या या माध्यमाचा उपयोग फसवणूक करुन पैसे कमविण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.