Pune : जुन्या भांडणाच्या रागातून मारहाण केल्यप्रकरणी एकाला मांजरी बुद्रुकमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मित्राबरोबरच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात तरुणाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिजीत महादेव कांबळे (वय २४, रा. घरकुल, मांजराईनगर, मांजरी बुद्रुक, ता.हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी सौरभ नेटके आणि मयूर शिंदे या दोघांवरही लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशिष बाळासाहेब उंद्रे (वय २४, रा. इंदिरानगर वस्ती, मांजरी खुर्द, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ता. ८ मे रोजी मांजरी खुर्द (ता. हवेली) आबा मुरकुटे यांच्या घराजवळ रात्री आठच्या सुमारास घडली. फिर्यादी यांचा मित्र विकास सोनावणे आणि आरोपी सौरभ नेटके यांची पूर्वी भांडणे झाली होती. त्यावेळी फिर्यादी विकास याच्याबरोबर होते. फिर्यादी मौजे मांजरी खुर्द येथून रस्त्यावर पायी जात असताना दुचाकीवरून ट्रिपल सिट येत फिर्यादीला लोखंडी कोयत्याने पाठीवर व डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करायची आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले कोयते आणि दुचाकी जप्त करणे बाकी आहे त्यामुळे सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.