गुन्हा दाखल करण्याची धमकी अन् वारंवार चौकशीला कंटाळून एकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीनं 2 वर्षापुर्वी आत्महत्या केली मात्र त्याची पोलिसांकडून चौकशी अद्यापही चालू असल्याने तसेच पोलिस कर्मचार्‍याकडून मिळालेल्या गुन्हा दाखल करण्याच्या धमकीने आणि वारंवार पोलिस चौकीत बोलावून त्रास होत असल्याने कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली.

शरद शिवाजी गुंजाळ (40, रा. भैरवनगर, धानोरी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी पोलिस कर्मचार्‍यावर कारवाई होत नाही तोवर शरदचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळा परिसरात तणावाचे वातावरण होते. याबाबत अधिक माहिती अशी की शरद गुंजाळ यांचा सन 2007 मध्ये रंजना यांच्याशी विवाह झाला होता. शरद हे वाहन चालक होते.

रंजना यांनी सुमारे 2 वर्षापुर्वी आत्महत्या केली. त्याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यू (एडी) ची नोंद आहे. रंजनाच्या भावाने तिने सासरच्या जाचाला कंटाळॅन आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या गुन्हयाचा तपास दोन वर्षानंतर देखील सुरू आहे. तपासाला पोलिस कर्मचारी वारंवार गुंजाळ यांना पोलिस चौकीत बोलावून त्रास देत होता तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होता. पोलिसाच्या अशा वागणुकीमुळे आणि त्रासाला कंटाळून गुंजाळ यांनी आत्महत्या केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.