Pune : पार्टीच्या बहाण्यानं त्यानं सेवानिवृत्त शिक्षकासह त्यांच्या पत्नीला हॉटेलमध्ये बोलावलं, अन् पुढं झालं असं काही…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पार्टी देण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त शिक्षकासह त्याच्या पत्नीला हॉटेलमध्ये बोलावून घेतले. आणि त्यांच्याच घरी चोरी केली. चोरी करणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ३४ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रवींद्र शेषराव अवधूत (वय ४०, रा. उरूळीकांचन, मूळ- धामणगाव, बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मोहन ढोणे (वय ६३) यांनी तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन ढोणे सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते पत्नीसह कोरेगावमधील मानस सरोवर सोसायटीत राहायला आहेत. त्याच सोसायटीमध्ये आरोपी रवींद्र अवधूत राहतो. त्यामुळे त्याची मोहन यांच्यासोबत ओळख होती. त्यातून त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी रवींद्रने ७ फेब्रवारी २०२० ला मोहन यांच्यासह पत्नीला हॉटेलमध्ये पार्टीच्या बहाण्याने बोलाविले होते. त्यानंतर स्वतःच्या मुलांना जेवायला घेऊन येतो असे सांगून रवींद्र मोहन यांच्या घरी गेला. बनावट चावीच्या साह्याने त्याने त्यांच्या घरातून एक लाख ७४ हजारांचे दागिने चोरून नेले. त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन रवींद्रने मोहन यांच्यासोबत जेवण केले. तक्रारदार मोहन यांना काही दिवसांत घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता, रवींद्रने चोरी केल्याचे दिसून आले. त्यानंतर मोहन यांनी त्याला जाब विचारला असता, रवींद्रने लक्ष्मीची मूर्ती परत दिली. उर्वरित दागिने लवकरच परत देण्याचे कबूल केले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. मात्र, रवींद्रने दागिने देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, एक वर्ष झाला तरी आरोपी दागिने देण्यास टाळाटाळ करू लागल्यानंतर मोहन यांनी ८ एप्रिल २०२१ ला लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या पथकाने आरोपी रवींद्रचा शोध सुरू केला. पण तो पुण्यात नव्हता. तो त्याच्या मूळगावी असल्याचे समजले. त्यानुसार त्याला अटक केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.