कौतुकास्पद ! बाळ पाळण्यात अन् आई ‘कोरोना’ची लागण झाल्याने रूग्णालयात, पुण्यातील महिलांनी घेतलं 4 दिवसाच्या लेकराचं मातृत्व

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मुंबईहून गावी गेलेल्या गर्भवतीने मुलीला जन्म दिला. मात्र ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे महिलेला लेकराला पाहताही आले नाही. काही दिवसांनी बाळाची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र तिचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न समोर आल्यानंतर मंचर ग्रामपंचायतीने 4 दिवसांच्या बाळाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला.

आई दवाखान्यात आणि नातेवाईक क्वारंटाइन असल्यामुळे बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी मंचर ग्रामपंचायतीने घेतली. मंचर ग्रामपंचायतीच्या अर्चना बेंडे आणि स्नेहा मिसाळ या दोन महिला कर्मचार्‍यांनी या 4 दिवसांच्या बाळाला ग्रामपंचायतीत आणले आहे. या बाळावर पुष्पवृष्टी करून, त्याला पाळण्यात घालून बारसेही केले आहे.

मुंबईहून ही महिला 28 मे रोजी प्रसूतीसाठी मंचर येथे गावी आली होती. गावी परतल्यानंतर महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. बाळलाही कोरोनाची लागण होईल, या भीतीनं संपूर्ण कुटुंब घाबरले होते. 6 जून रोजी या महिलेची प्रसुती झाली आणि तिने मुलीला जन्म दिला. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बाळाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. बाळाची आई कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाइन राहण्यास सांगितले. त्यामुळे बाळाचा सांभाळ कोण करणार असा सवाल उभा राहिला. यावेळी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी पुढाकार घेऊन बाळाचा सांभाळ ग्रामपंचायतीतील महिला करतील, असे सांगितले. सध्या हे बाळ मंचर ग्रामपंचायतीत असून, महिला सदस्य बाळाची काळजी घेत आहे.