Pune : मंगलकार्यालयांना क्षमतेच्या 50 % व्यवसायाला परवानगी द्यावी, शिवसेनेची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, खुले लॉन या ठिकाणी पन्नास लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्य करण्याची परवानगी आहे. ही अट शिथील करुन क्षमतेच्या पन्नास टक्के व्यवसायास परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक प्रशांत बधे, माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांच्या सह्या आहेत.

राज्य सरकारने जिम, हॉटेल, रेस्टॉरंट्स यांना पन्नास टक्के क्षमतेने व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर पुण्यातील मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, खुले लॉन या व्यावसायिकांना परवानगी द्यावी. आरोग्यविषयक सर्व नियम पाळण्याची त्यांची तयारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात जवळपास पाचशे लॉन्स, सभागृहे, मंगल कार्यालये आहेत. या व्यवसायावर केटरर्स, वाढपी, आचारी, अन्नधान्य व्यापारी, दूधवाले, वाजंत्रीवादक, फूलवाले, सजावटकार, रोजंदारीवरचे कामगार असे शेकडो व्यावसायिक अवलंबून आहेत. लॉकडाऊनच्या काळात व्यवसायातील झालेले त्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.