Pune : बाजारात झेंडूच्या फुलांची आवक घटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला आणि फूलशेतीला चांगलाच फटका बसला. त्याचे परिणाम शहरातील बाजारात जाणवू लागलेले आहेत. नवरात्राच्या काळात गेंदेदार पिवळ्या आणि सोनेरी रंगाच्या झेंडूच्या फुलांची आवकही जोरदार असते. या फुलांना उठावही चांगला असतो. यंदा मात्र, जोरदार पावसामुळे फुलांच्या शेतीलाच जबरदस्त तडाखा बसल्याने त्याचा परिणाम झेंडूवरही झाला आहे. गेल्या वर्षी पुण्याच्या बाजारपेठेत नवरात्राच्या काळात दररोज सत्तर हजार किलो झेंडूच्या फुलांची आवक होत होती. यंदा दररोज केवळ पंचेचाळीस हजार किलो इतकी ती घटली आहे. दसऱ्याच्या दिवशी किरकोळ बाजारात झेंडूच्या फुलांचा दर नव्वद ते शंभर रुपये किलो राहील अशी शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे झेंडूचे पीक पंधरा ते वीस टक्केच राहिले अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यातूनही बाजारात आलेल्या मालात खराब फुलांचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्तच होते. यंदा झेंडूची आवक घटलेली आहेच आणि मागणीही कमी आहे, अशी स्थिती बहुधा पहिल्यांदाच झाली असावी. मंदिरे बंद असल्याने झेंडूच्या फुलांना मागणी नाही. काही खाजगी ऑफिसेस आणि कारखान्यांमध्ये खंडेनवमी साजरी करण्यात येते. देवतांचे फोटो, मशिनरी यांना वाहाण्यासाठी झेंडूच्या फुलांच्या माळांना खूप मागणी असते. शिवाय वास्तूशांत तसेच नवीन वस्तूंची, वाहनांची खरेदी केल्यावर त्याचीही पूजा झेंडूच्या फुलांनी करण्यात येते. कोरोना साथीमुळे अनेक ऑफिसेस पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत, वस्तू-वाहने यांची खरेदीही घटलेली आहे. परिणामी झेंडूच्या फुलांची मागणी घटली.