Coronavirus Impact : पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड 2 दिवसांसाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध 82 संघटनांच्या प्रतिनिधींनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी आडते असोसिएशन आणि कामगार संघटानांनी देखील मार्केट यार्डमधील व्यावहार दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आडते असोसिएशन व दोन्ही कामगार संघटना यांची आज (बुधवार) तातडीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत शुक्रवार ( दि.20) व शनिवार (दि.21) रोजी फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा बाजार संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये दर बुधवारी व दर शनिवारी या दोन दिवशी संपूर्ण बाजार स्वच्छतेकरिता बंद राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या वतीन देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लग्नसराई सुरु असल्याने पुण्यात सोने, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोक येत असतात. त्यामुळे दुकानामध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध संघटनांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली असून त्यात चर्चा करून बंद वाढवायचा की स्थगित करायचा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.