‘मार्केटयार्डमधील भाजीपाला व फळबाजार ‘कर्फ्यू’ असेपर्यंत बंद ठेवा’, आडते असोसिएशन आणि कामगार युनियनची मागणी

मार्कैटयार्ड, दि. ८ (प्रतिनिधी)- कोरोनाचा वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर गुलटेकडी परिसर सील केला असून कर्फ्यु लावण्यात आला आहे. मार्केटयार्डमध्ये काम करणारे हमाल, मापाडी व अन्य कर्मचारी यांच्यासह आडते आणि व्यापारीही गुलटेकडी, मार्केटयार्ड परिसरात राहात असून त्यांना कर्फ्युमुळे बाजारात येणे शक्य नसल्याने मार्केटयार्डातील यंत्रणा कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्फ्यु आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कर्फ्यु संपेपयर्र्त भाजीपाला व फळबाजार बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी आडते असोसिएशन आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे.

आडते असोसिएशनचे, कामगार युनियन, तोलणार संघ आणि टेम्पो संघटनेने यासंदर्भातील निवेदन बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढत असलेल्या गुलटेकडी, मार्केटयार्ड परिसरासह शहराच्या मध्यवर्ती शहरातील पेठांमध्ये महापालिकेने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने कर्फ्यू लागू केला आहे.

या परिसरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते बंद केले असून घरातून बाहेर निघाल्यास पोलिस कसून चौकशी करून कारवाईही करत आहेत. विशेष असे की, मार्केटयार्डमध्ये काम करणार्‍या अगदी हमाल व अन्य कर्मचार्‍यांपासून टेम्पो चालक, आडते व व्यापारीही मार्केटयार्ड परिसरातच राहायला आहेत. याच परिसरात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे संसर्गाची भितीही अधिक असून मार्केटयार्डात येणार्‍या कर्मचार्‍यांपासून अथवा अन्य घटकांपासून त्याचा प्रसार सर्वदूर होईल, अशी शंकाही. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कर्फ्यु सुरू असेपर्यंत मार्केटयार्डमधील भाजीपाला व फळबाजार तसेच फुलबाजारही बंद ठेवण्यात यावा, असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आज मार्केटयार्डमध्ये आठवड्याच्या वेळापत्रकानुसार कांदे , बटाट्याची व फळांची आवक झाली. १६० वाहनांमधून ५२०० क्विंटल फळे तसेच ९३ वाहनांमधून ६२०० क्विंटल कांदे, बटाट्याची आवक झाली आहे. दरम्यान, मोशी, मांजरी आणि खडकी येथील उपबाजारामध्ये ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील उपबाजार बंद ठेवण्यात आले होते, असे बाजार समितीच्यावतीने कळविण्यात आले.