Pune : वाद घालत विवाहितेच्या अंगावर ‘अ‍ॅसिड’सदृश द्रव्य टाकलं, महिला जखमी, पुण्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   विवाहानंतर मैत्रिणीस भेटण्यास बोलावून तिच्याशी वाद घालत तिच्या अंगावर अ‍ॅसिडसारखे द्रव्य टाकत तिला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील पर्वती दर्शन भागात ही घटना काल घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मित्र अबुझर आय्याज तांबोळी (रा. पर्वती) याला अटक केली आहे. याबाबत 18 वर्षीय तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी फिर्यादी तरुणी व आरोपी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण काही महिन्यांपूर्वी तरुणीचा विवाह झाला. यानंतर तरुणी तिच्या पतीसह माहेरी सुट्टीसाठी आली होती. यावेळी आरोपीने काल तिला भेटण्यासाठी बोलावले. दोघे भांबरे शाळेजवळ भेटले. यावेळी तरुणीने त्याला आता तू माझ्या मागे लागू नकोस, माझे लग्न झालेले आहे, असे समजावून सांगत होती. मात्र, अबुझर याने रागाच्या भरात तिच्याशी वाद घातला. तसेच तुझे अपने आप पर गुरुर है ना, देख मै तेरा गुरुर तोड देता हूँ, असे म्हणत तिच्यावर अ‍ॅसिडसारखे द्रव्य टाकले. यानंतर तो फरार झाला. तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडले. दरम्यान, तरुणीवर उपचार सुरू असून, नेमके अ‍ॅसिड टाकले की, आणखी काही हे समजले नसून, डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती मिळेल, असे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास सुरू आहे.