माथाडी कामगाराला सायबर चोरट्यांचा फटका, खात्यातून पावणे दोन लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सायबर चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, एका माथाडी कामगाराच्या खात्यावरून या सायबर चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये ट्रान्सफर करून गंडविले आहे. याप्रकरणी भरत जगताप (वय 40, रा. लातूर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप मार्केटयार्डमध्ये माथाडी कामगार होते. यावेळी त्यांनी बँकेत बचत खाते उघडले होते. त्यामध्ये कामातून मिळालेली रक्कम जमा केली होती. काही दिवसांपुर्वी त्यांनी काम सोडल्यानंतर गावी गेले. त्यावेळी सायबर चोरट्यांनी त्यांच्या बचत खात्याचा पासवर्ड आणि गोपनीय माहिती चोरुन 1 लाख 79 हजार रुपये वळवून फसवणूक केली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

तसेच, परदेशातील मित्राचा बनावट मेल आयडी तयार करुन जेष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. बनावट इमेल त्यांना पाठवून 1 लाखाची मदत मागितली. त्यानुसार जेष्ठ नागरिाकने ऑनलाईनरित्या बँकखात्यावर 1 लाख रुपये जमा केले. त्यानंतर त्यांनी तुर्कीतील परदेशातील मित्राला फोन करुन पैसे मिळाले का अशी विचारणा केली. त्यावेळी मित्राने पैसे मागितले नसल्याचे सांगितले. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे.