पुण्यात सर्वप्रथम शिवाजीनगरचा ‘निकाल’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान कॅन्टोंन्मेंट मतदारसंघामध्ये झाले असून त्यापेक्षा किंचित अधिक मतदान शिवाजीनगर मतदारसंघामध्ये झाले आहे. परंतू कॅन्टोंन्मेट मतदारसंघामध्ये तब्बल २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने शिवाजीनगर मतदारसंघाचा निकाल सर्वप्रथम लागेल, अशी शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
कॅन्टोंन्मेट मतदार संघामध्ये ४३. २८ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघामध्ये १ लाख २६ हजार ८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये ४३.९६ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात १ लाख ३४ हजार ३३५ मतदारांनी हक्क बजावला असून दहा उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले आहेत.

जिल्ह्यातील शहरी भागात विशेषत: पुणे शहरामध्ये मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. पुणे शहरातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोंन्मेंट आणि कसबा पेठ मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यानच नागरिकांमध्ये उत्साह नसल्याचे दिसून येत होते. त्याचे प्रतिबिंब मतदानातही उमटले. ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला मतदार संघात टक्केवारीची पन्नाशी ओलांडली. तेथे ५१. ३५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील मतदारांची संख्या ४ लाख ८६ हजार ९४८ इतकी असून २ लाख ५० हजार ७१ नागरिकांनी मतदान केले. शहरातील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. त्याखालोखाल ४ लाख ५६ हजार ४८७ मतदार असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये २ लाख १४ हजार १६४ मतदारांनी अर्थात ४६.९२ टक्के मतदारांनी मतदान केले. तर सर्वात कमी मतदान कॅन्टोंन्मेंट मतदार संघामध्ये झाले.

कॅन्टोंन्मेट मतदारसंघात मुळातच २ लाख ९१ हजार ३४४ मतदार असून येथे फक्त ४३.२८ टक्के अर्थात १ लाख २६ हजार ८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर शिवाजीनगरमध्येे ३ लाख ५ हजार ५८७ मतदारांपैकी १ लाख ३४ हजार ३३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कॅन्टोंन्मेंट मध्ये २८ उमेदवार असल्याने येथे मतमोजणीच्या प्रत्येक फेरीची नोंद करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्या तुलनेत दहाच उमेदवार असलेली शिवाजीनगर मतदारसंघाची मतमोजणी लवकर पुर्ण होवून जिल्ह्यातील पहिला निकाल घोषित होईल, अशी शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Visit : Policenama.com

You might also like