‘प्रत्यक्षात आणि कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी, न्यायलायात प्रतिज्ञापत्र सादर करणार’ पुण्याच्या महापौरांची माहिती; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबई हायकोर्टाने पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करुन पुण्यासह ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे, त्या ठिकाणी पूर्वीसारखा लॉकाडाऊन करावा, अशा सूचना सरकारला दिल्या. यावेळी उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेचे आयुक्त हे मुंबई पालिकेच्या आयुक्तांसोबत का बोलत नाहीत ? असा प्रश्न विचारला. यावेळी कोर्टाने मुंबई पालिकेचा पॅटर्न इतर पालिकांनी राबवला पाहिजे, असा सल्ला दिला. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना प्रत्यक्षात आणि कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी असल्याचा गंभीर आरोप केला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, वस्तुस्थिती वेगळी असून कोर्टासमोर कोणी, कशी आकडेवारी दिली याची माहिती घेतली जात आहे. प्रत्यक्षात आणि कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी आहे. म्हणूनच आम्हाला यासंदर्भात खुलासा करावा लागत आहे, असे महापौर म्हणाले. कोर्टात जी माहिती दिली जाते त्याच आधारे कोर्ट आपले म्हणणं मांडत असतं. पण एक शंका आहे की, ही आकडेवारी नेमकी कधीची आहे. गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या आकडेवारीत विसंगती पहायला मिळत आहे. पुणे शहरातील स्थिती चांगली आणि नियंत्रणात आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पुण्यामध्ये गेल्या 15 दिवसांत रुग्णसंख्येत 16 हजारांनी घट झाली आहे. पुण्यात 1 लाखांच्या वर सक्रिय रुग्ण असल्याचा दावा केला जात आहे. मात्र पुण्यात सध्या 39 हजार सक्रिय रुग्ण आहेत. कदाचित त्यामध्ये पुणे शहर, जिल्हा, पिंपरी चिंचवड याचीही आकडेवारी असावी. पण पुण्यात पॉझिटिव्हिटी, मृत्यूदर, सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

आज पुणे शहरातील परिस्थिती चांगली आहे. जनजीवन सुरळीत होण्यासाठी सकारात्मक वातावरण आहे. पण अशा परिस्थितीत रुग्ण संख्या जास्त असल्याचा मेसेज आला तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. या दृष्टीकोनातून महापालिका म्हणून आम्ही कोर्टात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करुन वस्तुस्थिती नेमकी काय आहे, ते सांगणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. सध्या पुणे शहरात कडक लॉकडाऊनची गरज नाही, कारण परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही त्यांनी सांगितले.