‘…हे शक्य नाही’, होम आयसोलेशन बंदला पुण्याच्या महापौरांचा विरोध, राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने कोरोना बाधितांच्या संदर्भातील नियमांमध्ये बदल केले आहेत. यापुढे कोरोना बाधित रुग्णाला होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये भरती करावे लागणार आहे. होम आयसोलेशन 100 टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार विरोध केला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, जेंव्हा गरज होती तेंव्हा हा नियम लागू करायला पाहिजे होता. सध्या पुण्यातील परिस्थिती आटोक्यात आली असताना पुन्हा नव्याने हा नियम आणण्याचं औचित्य लक्षात आले नाही. आता येथून पुढे होम आयसोलेशनच्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणं आणि त्यांची व्यवस्था करणं शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णांची संख्या वाढत गेल्यास जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने नव्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महापौरांनी केली आहे.

राज्यातील होम आयसोलेशन 100 टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार असल्याची माहिती देत राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. मात्र, होम आयसोलेशन बंद करण्याच्या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध दर्शवला आहे.

‘या’ जिल्ह्यात होम क्वारंटाईन बंद
पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद