Pune : पुण्यात सुलतान उर्फ टिप्या शेख टोळीवर मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ताडीवाला भागात दहशत माजवणाऱ्या सुलतान उर्फ टिप्या शेख टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्काची कारवाई केली. तडीपार असतानाही त्याने याच परिसरात येत टोळक्याला घेऊन 14 वर्षाच्या मुलावर हल्ला केला होता. ही 10 जणांची टोळी असून, 9 जणांना अटक केली आहे. पण, टोळी प्रमुख टिप्या फरार आहे. आयुक्तांची ही 30 वी मोक्का कारवाई आहे.

विनोद उर्फ विन्या सुनील वाघमारे, साहिल उर्फ सोन्या राजू वाघमारे, श्याम किशोर काळे, शुभम अनिल धिवार, रामनाथ उर्फ पापा मेनिनाथ सोनवणे, सागर उर्फ सॉगी किशोर गायकवाड, अनिकेत किशोर कंदारे, सौरभ तिमाप्पा धनगर आणि अतुल श्रीपास म्हस्कर उर्फ सोनू परमार अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

या टोळीचा म्होरक्या सुलतान उर्फ टिप्या लतीफ शेख (रा. ताडीवाला रोड) हा फरार आहे. त्याने आणि इतरांनी या परिसरात दहशत निर्माण केली होती. दरम्यान कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरात कडक संचारबंदी आहे. तरीही आरोपींनी एका 14 वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. टोळीप्रमुख टिप्या हा तडीपार काळात असताना शहरात आला आणि त्याने साथीदार यांना घेऊन हा गुन्हा केला.

त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला. तर आर्थिक फायद्यासाठी तसेच परिसरात दहशत रहावी, यासाठी टोळी तयार केली. वेगवेगळ्या आरोपींना घेऊन त्याने हे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने या भागात गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी मोक्काचा प्रस्ताव तयारकरून तो परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांचेकडे पाठवला होता. त्याची छाननी करण्यात आली. तसेच हा प्रस्ताव डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीवर मोक्काची कारवाई केली.

पोलीस आयुक्त यांची मोक्काची 30 वी कारवाई असून, या वर्षातील 25 वा मोक्का आहे.