Pune : जबरी चोर्‍या, घरफोड्या अन् वाहन चोरी करणार्‍या टोळीवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जबरी चोऱ्या, घरफोड्या अन वाहन चोऱ्या करणाऱ्या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्काची कारवाई करत या टोळ्यांवर वचक बसविण्यास सुरुवात केली आहे. दोन जणांना पकडण्यात आले असून, टोळीतील दोघे पसार आहेत. या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24, रा. हडपसर) व नागेश मनोहर वाकडे (वय 21) अशी मोक्काची कारवाई करून अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे पसार आहेत.

शहरात घरफोड्या, वाहन चोऱ्या आणि जबरी चोऱ्या वाढल्या आहेत. दरम्यान यातील फिर्यादी हे वानवडी परिसरात हॅवनपार्क येथून महंमदवाडी रोडने घरी जात असताना दोन दुचाकीवर चौघेजण आले. त्यांनी फिर्यादी यांना अडविले. तसेच, त्यांना कोयत्याचा धाक दाखवून रोकड व चांदीची अंगठी चोरुन नेले होते. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत या दोघांना अटक केली आहे.

त्यावेळी त्यांनी हा गुन्हा त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघांचा शोध घेतला जात आहे. अजिनाथ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत. तर नागेशवर 3 गुन्हे दाखल आहेत. तसेच याचवेळी या आरोपींनी टोळी तयारकरून आर्थिक फायदा होण्यासाठी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. तसेच तो अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे पाठवला. त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मोक्का कारवाईने मात्र गुन्हेगार दहशतीखाली आहेत. आयुक्तांची ही 27 वी मोक्का कारवाई आहे.