पुणे मेट्रो मार्गातील मोठा अडसर झाला दूर, उच्च न्यायालयानं दिले ‘हे’ आदेश

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – पुणे मेट्रो प्रकल्पाच्या (pune Metro) शिवाजीनगर ते रामवाडी या मार्गिकेसाठीचा येरवड्याच्या येथील जागेचा मोठा अडथळा दूर झाला आहे. येरवडा येथील पाच हजार चौरस मीटरची जागा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) 15 पंधरा दिवसांमध्ये (High Court Orders To Handover Yerawada Land) हस्तांतरित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 23) दिले आहेत.

मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे. कल्याणीनगर मधून येणाऱ्या मार्गिकेचे काम येरवड्याजवळ जागेच्या वादामुळे थांबले होते. येथील एका जागेवरून वाद सुरू असून तो वाद न्यायालयात प्रलंबित होता. ही जागा सरकारच्या मालकीची असल्याचे सांगण्यात येत होते. तरी त्यावर खासगी व्यक्ती आणि संस्थांनी दावा सांगितला होता. सदरची जागा मिळत नसल्याने येरवड्यातील पर्णकुटी चौकापर्यंतचे काम महामेट्रोला करता येत नव्हते. जागेअभावी नागरिकांच्या हिताच्या मेट्रोसारख्या प्रकल्पाला विलंब होत असल्याने ही जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती महामेट्रोने उच्च न्यायालयाला केली होती. या जागेसंदर्भात दाखल याचिकाकर्त्यांनी मेट्रोला आवश्यक 5 हजार चौरस मीटरची जागा देण्यास कोणताही विरोध नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे महामेट्रोला आवश्यक जागा पुढील 15 दिवसांत हस्तांतरित करावी, असे आदेश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

आता कामाला गती येणार
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही जागा महामेट्रोच्या ताब्यात मिळाल्यानंंतर तातडीने तेथील अपूर्ण राहिलेल्या कामाला सुरुवात होणार आहे. ही जागा ताब्यात नसल्याने मेट्रोचे 300 मीटरचे काम ठप्प होते. कल्याणीनगर ते येरवडा दरम्यानचा मार्ग जोडण्याचे काम थांबले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे ही अडचण दूर झाली असून येथे नऊ खांब (पिलर) उभारण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, असा विश्वास महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

You might also like