Pune News : पुणे मेट्रोची झेप आता सासवडपर्यंत, हडपसरपासूनचा मार्ग सर्व्हेक्षणाच्या अंतिम टप्प्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील शिवाजीनगर-हडपसर येथील गाडीतळ ते सासवड असा आणखी एक मेट्रो मार्ग ‘पीएमआरडीए’कडून प्रस्तावित केला आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रोकडून अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे शिवाजीनगरहून मेट्रोचा एक मार्ग लोणी काळभोरला, तर दुसरा मार्ग गाडीतळ येथून सासवड रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे हे काम रखडले होते. लवकरच या मेट्रो मार्गाचा सर्वेक्षण अहवाल प्राप्त होईल होईल, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान शिवाजीनगर पासून ही मेट्रो हडपसरला नेण्याची मागणी होती. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी ‘शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनपर्यंत दर्शविण्यात आलेला मेट्रो मार्ग लोणी काळभोरपर्यंत वाढवावा. दिल्ली मेट्रोने फुरसुंगीपर्यंतचा सादर केलेला अहवाल सुधारित करून तो पाठवावा, अशा सूचना ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणात ट्रॅफिक सर्व्हे महत्त्वाचा भाग आहे. दिल्ली मेट्रोकडून या मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम गतीने सुरू आहे. शिवाजीनगर ते लोणीकाळभोर दरम्यानच्या मार्गाचे सर्वेक्षण करतानाच हडपसर येथील गाडीतळापासून सासवड रेल्वे स्टेशन या मार्गावरही दुसरा मेट्रो मार्ग प्रस्तावित करावा, असा निर्णय पीएमआरडीएने घेतला होता. त्यानुसार हे कामही दिल्ली मेट्रोला दिले आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रोकडून लवकरच शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड असे दोन मार्गांचे सर्वेक्षण करून अहवाल लवकरच सादर केले जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

प्रस्तावित मार्ग
शिवाजीनगर (कोर्ट)- रेल्वे कॉलनी-कलेक्‍टर ऑफिस, एमजी रोड-फॅशन स्ट्रीट-मंमादेवी चौक-रेसकोर्स-काळूबाई चौक-वैदूवाडी-हडपसर फाटा-हडपसर बस डेपो-ग्लायडिंग सेंटर-फुरसुंगी आयटी पार्क-सुलभ गार्डन असा मार्ग होता. तो आता सुलभ गार्डन येथून लोणीकाळभोरपर्यंत नेण्यात येणार असून त्या मार्गाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.