Good News ! पुणे MHADA च्या 2890 घरांची सोडत, उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्धघाटन; ऑनलाईन नोंदणी सुरु

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – म्हाडाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना माफक दरात दर्जेदार व हक्काची घरे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हाडाची सोडत प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी पुणे म्हाडाच्या लॉटरी योजनेत अर्ज करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. सर्वांसाठी घर हे शासनाचे धोरण असून पुणे म्हाडाने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेने टाकलेले आश्वासक पाऊल असल्याचे ते म्हणाले.

पुणे म्हाडाच्या वतीने 2 हजार 890 सदनिकांच्या लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उद्घाटन मंगळवारी (दि. 13) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी झाले. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर (सर्वजण ऑनलाईन पध्दतीने) आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या, तसेच उद्यापासून सुरु होणाऱ्या असलेल्या रमजान महिन्याच्याही शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.