Pune : पोलंडमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक तरूणांना लाखोंचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पोलंड देशात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अमोल कांबळे (वय 29, मंगलदास रोड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हा हाऊस किपिंगचे कामे करतो. तर त्याचे मित्र देखील मिळेल ते काम करतात. दरम्यान त्यांची आरोपीशी ओळख झाली होती. त्याने तुम्हाला पोलंड देशात चांगली नोकरी लावतो असे म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने फिर्यादीसह त्याच्या चार मित्रांना देखील असे सांगत त्याच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी एकूण 1 लाख 80 हजार रुपये घेतले. पण त्यांना नोकरी लावली नाही. यावेळी त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. दरम्यान आरोपीने अश्या प्रकारे अनेक तरुणांची फसवणूक केली आहे. जवळपास 10 तरुणांची प्राथमिक माहिती मिळाली आहे, असे उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. आरोपीचा शोध सुरू असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल.