पुण्यात कर्मचाऱ्यासह वाहतूक पोलिस निरीक्षकांना ‘धक्काबुक्की’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रिपल शीट फिरणाऱ्या तरुणांना थांबवून लायसन्सची विचारणा केल्याच्या रागातून पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कोंढव्यातील सोमजी चौकात घडली.

रजनीकांत नागोराव कांबळे (वय २३, साबळेवाडी, खेड), प्रसाद दत्तात्रय रामापुरे (वय २२), सूर्यकांत आनंता फुगारे  (वय २२, रा. लक्ष्मीनगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक अमित सस्ते यांनी  ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी सकाळी दहाच्या सुमारास कर्मचारी सस्ते आणि वाहतूक पोलीस निरीक्षक सी. एम. निंबाळकर सोमजी चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी रजनीकांत, सूर्यकांत आणि प्रसाद दुचाकीवर ट्रीपलसीट प्रवास करीत असल्यामुळे निंबाळकर यांनी त्यांना थांबवित लायसन्स मागितले. त्याचा राग आल्यामुळे तिघांनी निंबाळकर यांच्यासह सस्ते यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर पुन्हा रात्री साडेदहाच्या सुमारास सोमजी चौकात येउन रस्त्यावरील बॅरिकेट्स बाजूला फेकले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दादा पवार अधिक तपास करीत आहेत.