खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील आमदारपुत्र आठवड्यानंतरही अद्याप फरार

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्यावर गोळीबार केल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा पुत्र सिद्धार्थ बनसोडे व इतरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेला आता आठवडा होत आला असला तरी पिंपरी चिंचवड पोलिसांना आमदारपुत्र सापडू शकलेला नाही. दरम्यान, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

साजिद मेहबूब शेख (वय २१, रा. मोरे वस्ती, चिखली) आणि रोहित अशोक कुसाळकर (वय २०, रा. रामनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रोहित ऊर्फ सोन्या गोरख भोसले (वय २०, रा. दळवीनगर, चिंचवड), सुलतान इम्तियाज कुरेशी (वय २०), ऋतिक ऊर्फ महादेव जगताप (वय २१) या आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी गेल्या बुधवारी (दि़ १२ मे) रोजी चिंचवडमधील काळभोरनगर येथे आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तानाजी पवार यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत प्रत्यक्षात आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे व इतरांनी त्यांचे निगडीतील कार्यालयातून जबरदस्तीने अपहरण करुन चिंचवडला आणले होते. तेथे त्यांनी पट्ट्याने मारहाण केली होती. तसेच आदल्या दिवशी ११ मे रोजी पवार यांच्या कार्यालयात शिरुन त्यांनी तानाजी पवार कोठे आहेत, अशी चौकशी करुन तेथील कामगारांना बेदम मारहाण केली होती़ असे निष्पन्न झाले होते. त्यावर पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, आठवड्यानंतरही पोलिसांना आमदारपुत्र अद्याप सापडू शकलेला नाही.

याबाबत पत्रकारांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना विचारले असता त्यांनी आमदारपुत्राचा फोन स्विच ऑफ असून, गुन्ह्यात कोणाचीही हयगय करण्यात येणार नाही. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.