Pune : लसीकरण केंद्रावरील हस्तक्षेप थांबविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे ‘मनसे’कडून स्वागत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लसीकरण केंद्रांवरील गोंधळ दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कडक पावले उचलली आहेत, याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केले आहे. ज्या लसीकरण केंद्रांवर मनसेचे बोर्ड, बॅनर, झेंडे असतील ते पुढील दोन दिवसांत आम्ही काढून घेत आहोत, अशी सहकार्याची भुमिकाही मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी घेतली आहे.

वागसकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनामध्ये लसीकरण केंद्रावरील गोंधळ कमी करण्यासाठी तसेच लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मनसेचे शहरअध्यक्ष वसंत मोरे, महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर, मनसेच्या महिला अध्यक्षा ऍड. रुपाली पाटील व पदाधिकार्‍यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश होता. मनसेच्या मागणीची तातडीने दखल घेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी लसीकरण केंद्रावरील गोंधळ कमी करून लसीकरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी निर्णय घेत अंमलबजावणीही सुरु केली. नागरिकांच्या हिताच्या निर्णयामध्ये मनसे कायम प्रशासनाच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही वागसकर यांनी दिली आहे. त्याचवेळी आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे सर्व लसीकरण केंद्रावर मनसेचे बोर्ड, बॅनर असतील ते आम्ही येत्या दोन दिवसांत काढून घेत आहोत, असे आश्‍वासनही वागसकर यांनी निवेदनाद्वारे दिले आहे.