पुण्यात नागरिकतेचा पुरावा मागत आहेत ‘मनसे’चे कार्यकर्ते, पोलिस देखील सोबत ‘हजर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वादग्रस्त मोहीम सुरू केली आहे. मनसेचे कार्यकर्ते शहरातील ज्या भागात बांगलादेशी राहतात त्या भागात जात नागरिकांकडून नागरिकत्वाचा पुरावा मागत आहेत. एका रिपोर्टनुसार पुणे शहरातील धनकवाडी भागात मोठ्या संख्येने लोक भाड्याने राहतात. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून भारतीय नागरिक असल्याचा पुरावा मागितला आहे. कागदपत्र दाखविल्यानंतर सत्यता पडताळणीसाठी पोलीस अधिकारी देखील त्यांच्यासोबत आहेत. पोलीस या कागदपत्रांचा तपास करत आहेत.

मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी आज याबाबत माहिती दिली आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून बांगलादेशी घुसखोर राहत आहेत असा त्यांचा अंदाज असलेल्या भागात मनसेचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना आपल्यासह धनकवडी भागात आणले आणि काही लोकांची चौकशी केली. तपासादरम्यान एका युवकाकडे दोन मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले आहे.

घुसखोरांना बाहेर करण्याची मागणी –

दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सीएए-एनआरसीच्या समर्थनार्थ एक विशाल रॅली काढली होती. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवैध बांगलादेशींना शहराबाहेर जाण्याची मागणी केली. घुसखोरांना देशाबाहेर घालवून देश स्वच्छ ठेवायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले. काही लोक फक्त शक्ती दाखवण्यासाठी सीएए-एनआरसीविरोधात आंदोलन करत असतील तर त्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.