Pune : रस्त्याने पायी जाणार्‍या युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात दुचाकीवरुन येत चोरटे पादचारी नागरिकांना वेगवेगळ्या बहाण्याने अडवत त्यांच्याजवळील किंमती वस्तू पळवत असताना चंदननगर भागात एका “दीदी”च्या हातातील मोबाईल “भुर्रर्र”करून पळविल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोपेड दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वडगाव शेरी परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान त्या काल दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास येथील मुंढवा-खराडी बायपास रोडने पाई चालत जात होत्या. त्यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत एच.पी. पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर पाठीमागून मोपेड दुचाकीवर दोन जण आले. ते “दीदी” हेल्प हवी आहे, असे म्हणाले. त्यामुळे फिर्यादी यांनी मान वळवली असता एकाने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. त्यानी आरडाओरडा केला. पण चोरटे पसार झाले होते. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन जाधव करत आहेत.