Pune : खंडणी उकळणार्‍या तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देणार्‍या टाक टोळीवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणी उकळणाऱ्या व ती न दिल्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार कारवाई करत लगाम लावला आहे. हडपसरमधील ही टोळी असून, यात 5 जनांचा समावेश आहे.

ओंकारसिंग करतारसिंग टाक (वय 26), सोरनसिंग करतारसिंग टाक (वय 21), अवतारसिंग करतारसिंग टाक (वय 28), जपानसिंग करतारसिंग टाक (वय 31), तुफानसिंग करतारसिंग टाक (वय 30) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. यात टोळी प्रमुख ओंकारसिंग व साथीदार जपानसिंग हे फरार असून, त्याचा सुरू आहे.

गाडीतळ परिसरातील रवी धोत्रे (वय 36) हे व्यवसायिक असून, त्यांचा वाळू व बांधकामाला साहित्य पुरविण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांनी राहत्या घराजवळ कॅनॉल शेजारी पत्र्याचे शेड मारून हा व्यवसाय केला आहे. तर आरोपी हे त्यांच्याकडे आले, त्यांना जागा खाली करा किंवा 2 लाख रुपये दे असे म्हणत खंडणी मागितली. पण, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तलवारीने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तपास करत असताना पाच आरोपी निष्पन्न झाले. त्यावेळी टोळीप्रमुख ओंकारसिंग हा टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी यातील तिघांना अटक केली. पण दोघे फरार आहेत.

तपासात टोळी सुरू करून गुन्हे करत असल्याने पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करावी, असा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. त्यानी या प्रस्तवाची छाननी केली. त्यानंतर हा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठवला. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ही 29 मोक्काची कारवाई आहे. तर या वर्षातील 24 वा मोक्का आहे.