Pune : दोन बडतर्फ पोलीस, पत्रकार, RTI कार्यकर्त्याविरुद्ध मोक्काची कारवाई, निष्पन्न झाला टोळीचा सूत्रधार, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील बहुचर्चित जमीनीच्या गुन्ह्यांत आज पुणे पोलिसांनी टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. यात आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे टोळी प्रमुख असल्याचे दिसून आले आहे. या मोक्काच्या कारवाईने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात दोन बडतर्फ पोलीस, पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्त्याचा समावेश आहे.

रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, बिबवेवाडी), बडतर्फ पोलीस शैलेश हरिभाऊ जगताप (रा. सोमवार पेठ, पोलीस वसाहत), परवेज शब्बीर जमादार (रा. सोमवार पेठ पोलीस लाईन), देवेंद्र फुलचंद जैन (रा. गणेश मळा, दांडेकर पूल), विशाल शिवाजी ढोरे, विनोद शिवाजी ढोरे (रा. शेवळवाडी), सुजित शिवदत्त सिंग (वय 39, रा. मंजुरी बुद्रुक), अस्लम्ब मजूर पठाण (रा. रेल्वे गेटजवळ, हडपसर), बालाजी विश्वनाथ लाखाडे (रा. मांजरी बुद्रुक), सचिन गुलाब धिवार (रा. मांजरी बुद्रुक), विठ्ठल रेड्डी (रा. हडपसर), गणेश आमदे (रा. हडपसर ), नितीन रामदास पवार (रा. मांजरी), अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुमंत रंगनाथ देठे (वय 58, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी आणि अनु़ जाती व अनु़ जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात हा मोक्का लावला आहे.

आरटीआय कार्यकर्त्या रवींद्र बऱ्हाटे हा टोळी प्रमुख असून, त्याने टोळी तयार करून गुन्हे केल्याचे म्हटले आहे. दरम्यान मोक्कानुसार कारवाई केल्यानंतर बडतर्फ पोलीस शैलेश जगतापसह तिघांना अटक केली आहे. तर दहाजण पसार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान रवींद्र बर्‍हाटेवर आत्तापर्यंत पुणे शहर, पुणे ग्रामिणमध्ये १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तर 0देवेंद्र जैन याच्यासह इतरांवर देखील शहरातील विविध भागात ८ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये फसवणूक करणे, खंडणी, आर्म अ‍ॅक्टसह गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रवींद्र बऱ्हाटे सापडेना

पुण्यात रवींद्र बऱ्हाटे इतरांवर पहिला गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल झाला. या गुन्ह्यात शैलेश जगताप, देवेंद्र जैन यांना अटक केली. त्यानंतर शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले. पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून मात्र रवींद्र बऱ्हाटे हा पसार झाला आहे. तो अद्याप देखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या फरार काळात ओळखीच्या एकाची स्कुटर चोरल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला आहे. उच्च न्यायालयाने बऱ्हाटेचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यानंतर देखील पुणे पोलिसांना तो सापडलेला नाही. त्यामुळे बऱ्हाटेला पकडणे हे पोलिसांसमोर अवाहन असणार आहे.