धक्कादायक ! पुण्यात करणी झाल्याचं सांगत खासगी क्लास घेणार्‍या महिलेशी अश्लील चाळे

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – तुमच्यावर करणी झाली असून माझ्यात दैवी शक्ती असल्याचे सांगत अश्लील चाळेकरून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोथरूड भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भरत केदमाने (रा. सोलापूर) याच्यावर विनयभंग तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता या खासगी क्लासेस घेतात. परंतु त्यांचे क्लासेस चालत नव्हते. दरम्यान त्यांची बहीण डॉक्टर आहेत. डॉक्टर बहिणीकडे एक महिला रुग्णालयात नोकरीस होती. त्यावेळी तिने आरोपीबाबत माहिती दिली. त्यानुसार पीडित महिलेची ओळख झाली. त्यावेळी आरोपीने करणी केली असून त्यामुळे तुमचे क्लासेस चालत नाहीत. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. काही विधी करावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून विधीसाठी 7 हजार रुपये घेतले.

तसेच फिर्यादीसोबत विधी करण्याच्या बहाण्याने त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखलकरून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.