पुण्यात दुचाकीला लावलेल्या बॅगेतून 52 हजाराची रोकड पळवली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील स्ट्रीट क्राईम थांबविणे पोलिसांना अशक्य झाले की काय अशीच म्हणायची वेळ झाली असून, येरवड्यात दुचाकीला अडकविलेल्या बॅगेतून ५२ हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना सोमवारी रात्री घडली.

याप्रकरणी राजेंद्र मलकप्पा भणगे (वय ३१, रा. सोमवार पेठ) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातचोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र मोटारींच्या इन्शुरन्सचे काम करतात. काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते येरवड्यात एका ग्राहकाच्या मोटारीचा इन्शुरन्स काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी इन्शुरन्सची जमा केलेली ५२ हजारांची रोकड त्यांनी बॅगमध्ये ठेवली. त्यानंतर ती बॅग दुचाकीला अडवून शेजारी मोटार पाहण्यासाठी गेले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतून ५२ हजारांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी पोलीस हवालदार लोंढे अधिक तपास करीत आहेत.