Pune : कोरोनामुळे मृत्यूदर वाढला ! स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी ‘वेटींग’ वाढले; विलंब टाळण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यासोबतच नैसर्गिक आणि अपघाती मृत्यूही होत असल्याने शहरातील बहुतांश स्मशानभूमी रात्रं दिवस धगधगत आहेत. दररोज शंभरच्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत असून यामुळे स्मशानभूमीतही आता ‘वेंटींग’ करावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पुन्हा एकदा कमीत कमी वेळेत मृतदेहांवर विशेषत: कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फेरनियोजन करण्यासाठी पावले उचलली आहेत.

मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या नोंदी तसेच अंत्यसंस्कारासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लागणारा वेळ यामुळे स्मशानभूमीमधील वेटींग वाढले आहे. शहरात १० विद्युत दाहिनी असून १३ गॅस दाहिनी आहेत. साधारण एका मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी दीड ते दोन तास लागतात. यामुळे वेटींगचा वेळ वाढत आहे. यामुळे प्रशासनाने पारंपारिक पद्धतीनेही अंत्यसंस्कार करण्यास सुरूवात केली आहे. दोन दिवसांपुर्वी अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची संख्या १४५ पर्यंत गेल्याने वैकुंठ स्मशानभूमीतही पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

यासंदर्भात विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले कोरोनामुळे मरण पावणार्‍यांचे दररोज १०० हून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. आतापर्यंत वैकुंठ स्मशान भूमी वगळता अन्य सात ठिकाणी असलेल्या विद्युत दाहिनी व गॅस दाहिनींमध्ये अंत्यसंस्काराला प्राधान्य देण्यात येत होते. परंतू संख्या वाढू लागल्यानंतर पारंपारिक पद्धतीने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तर शनिवारपासून वैकुंठ स्मशानभूमीत पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ससून रुग्णालयातून दररोज ५० च्या आसपास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी महापालिकेच्या ताब्यात देण्यात येतात. रात्रीच्यावेळी रुग्ण दगावल्यास अनेक नातेवाईक सकाळी मृतदेह ताब्यात घेण्याची कागदोपत्री कार्यवाही करतात. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईक आढळले नाही तर रुग्णालय पोलिसांमार्फत एमएलसी करतात. यामुळेही वेळ लागतो. त्यामुळे बरेचदा एकाचवेळी १० ते १२ मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठीही विलंब होतो.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मृतदेह मिळाल्यानंतर वेळेत शववाहिका तेथे पोहोचेल यासाठी अंतर्गत वापरासाठीचे ऍप तसेच मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर शहरातील कोणत्या स्मशानभूमीमध्ये कमीतकमी वेेळेत त्यावर अंत्यसंस्कार होउ शकतील याची अगदी रुग्णवाहीकेचा चालक, स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच नातेवाईकांनाही माहिती देण्यासाठी सेंट्रलाईज यंत्रणा अधिक सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्याच्या स्थितीत शहरातील स्मशानभूमीमध्ये अहोरात्र अंत्यसंस्कार होत आहेत. दुर्देवाने यापेक्षा वाईट परिस्थिती येउ नये. परंतू तशी परिस्थिती ओढवलीच तर नागरी वस्तींपासून बाजूला जागांचा शोध घेउन त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठीही चाचपणी करण्यात येत आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे सावडणे व तत्सम धार्मीक विधी बंद ठेवण्यात करण्याचे नियोजन करण्यात येत असून सध्या वैकुंठ अथवा अन्य दाहिन्यांमध्ये जशा अस्थि उपलब्ध करून दिल्या जातात तीच पद्धत पारंपारिक अंत्यसंस्कारांसाठीही वापरण्याबाबत विचार सुरू आहे.