पुणे : नवजात अर्भक टाकून आई-बाप ‘बेपत्ता’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुरूष जातीचे जन्मलेले नवजात अर्भक उघड्यावर टाकून त्याचे आई-बाप बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तमनगर येथील स्मशानभुमीजवळील मुळा नदीच्या पात्रात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सुनिल धावडे (वय 34, रा. उत्तमनगर गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी पुरूष किंवा स्त्री विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर स्मशानभूमी जवळून जात असताना त्यांना मुळा नदी पात्रात एक नवजात अर्भक असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर उत्तमनगर पोलीसांनी येथे धाव घेतली. पोलीसांनी पाहणी केल्यानंतर हे पुरूष जातीचे अर्भक असल्याचे समोर आले.
त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांकडून अर्भकाला टाकणार्‍याचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/