Pune : कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याने महापालिका रुग्णालयांतील आणि विलगीकरण कक्षातील बेडस्चे फेरनियोजन करण्याच्या ‘हालचाली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे महापालिकेची कोव्हीड रुग्णालये तसेच क्वारंटाईन सेंटरमधील बेड्स देखील मोठ्याप्रमाणावर रिकामे राहात असल्याचे पाहायला मिळत आहे. यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्याची तयारी करतानाच सध्याच्या बेडस्चे योग्य नियोजन करून यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. मार्च व एप्रिलमध्ये तर एका दिवसांतील रुग्णसंख्येने सात हजारांचा टप्पा ओलांडला होता तर अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्याही ५५ हजारांच्या जवळपास पोहोचली होती. मृतांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची भलतीच दमछाक झाली होती. अशातच खाजगी रुग्णालयांतील बेडस् ताब्यात घेण्यापासून ऑक्सीजन, रेमडिसिविर इंजेक्शनची पुर्तता करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने अहोरात्र प्रयत्न केले. महापालिकेने स्वत;च्या रुग्णालयांसोबतच खाजगी संस्थांच्या कोव्हिड सेंटर्स व खाजगी दवाखान्यांमध्ये साडेआठ हजारांहून अधिक ऑक्सीजन व सातशेहून अधिक व्हेंटीलेटर्स बेडस् निर्माण केले. यासोबतच कोरोना बाधितांच्या विलगीकरणासाठी सात ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स निर्माण करतानाच त्याठिकाणी बावीसशे बेडस्ची निर्मिती केली.

दरम्यान, राज्यात लॉकडाउन करण्यात आल्यानंतर मागील दहा ते बारा दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी ५५ हजारांवर पोहोचलेली अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या २३ हजारांपर्यत कमी झाली आहे. यापैकी सात हजार रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून , विलगीकरण कक्षात एक हजाराच्या आसपास रुग्ण आहेत. तर उर्वरीत बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे काही दिवसांपुर्वी ‘बेडसाठी वणवण कमी झाली असून महापालिकेचे जंबो रुग्णालयामध्ये ४८ बेडस्, बाणेर कोव्हिड हॉस्पीटलमध्ये १५, ईएसआयसी हॉस्पीटलमध्ये ३, नायडू हॉस्पीटलमध्ये ७ , गणेश कला क्रिडा कोव्हिड सेंटरमध्ये २५, खेडेकर हॉस्पीटलमध्ये २, शासनाच्या ससून रुग्णालयात २९ तर पुणे कॅन्टोंन्मेट रुग्णालयातील १४ ऑक्सीजन बेडस् रिक्त आहेत. सध्याचा पॉझीटीव्हीटी रेट पाहाता येत्या चार -पाच दिवसांत वरिल बहुतांश रुग्णालयातील रुग्णसंख्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाने तिसर्‍या लाटेच्यादृष्टीने लहान मुलांच्या उपचारासाठी बेडस्ची व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले असून सर्वच रुग्णालये ऑक्सीजन स्वंयपूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत. अनेक ठिकाणी आयसोलेशन बेडस्चीही निर्मिती करण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्या रुग्णालयात सध्या कमी रुग्ण आहेत, त्या रुग्णालयामध्ये नवीन रुग्ण दाखल करण्याऐवजी ज्या मोठ्या रुग्णालयात बेडस् शिल्लक आहेत त्याठिकाणी दाखल करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. जेणेकरून केवळ १० ते १५ रुग्णांसाठी मोठ्याप्रमाणावरील मनुष्यबळ व साधनसामुग्रीची बचत होईल. तसेच औषधे, ऑक्सीजनपासून सर्वच अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा, डॅशबोर्डचे नियोजन करणेही आवाक्यात येईल, यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. ही कार्यपद्धती विलगीकरण कक्षासाठीही अवलंबिली जाणार असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.