हडपसरमधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद कार्य : राजदीप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीमध्येसुद्धा पडद्यामागे राहून देशसेवा करणारा वर्ग मोठा आहे. त्यातीलच महावितरण हा मोठा विभाग आहे. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी जमा करून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना मदतीचा हात दिला, ही बाब कौतुकास्पद आहे, असे मत बंड गार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप यांनी व्यक्त केले.

राजदीप म्हणाले की, कोरोना व्हायरसचा विषाणू रोखण्यासाठी मागिल दीड महिन्यापासून देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्या मजूरवर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब समजून घेत महावितरणच्या हडपसर विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतः वर्गणी जमा करून गरजू कुटुंबीयांना गहू, तांदूळ, तूरडाळ, तेल असे 12 किलो धान्याचे वाटप केले. तसेच, भेकराईनगर (तुकाईटेकडी) येथील श्री छत्रपती शंभूराजे आश्रमशाळा आणि मांजरी बुद्रुक येथील अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांच्या सन्मति बाल निकेतन संस्थेला दोनशे किलो गहू, दीडशे किलो तांदूळ, पन्नास किलो तूरडाळ आणि सूर्यफुल तेलाचा डबा असे साहित्य दिले.

बंड गार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप, हडपसरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंडित दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम

बंडापल्ले, विकास तायडे, सखाराम कळासे, पोपट सातपुते, मनोज सूर्यवंशी, योगेश देशमुख, सचिन गायकवाड, सुभाष गिरी, सचिन धंगेकर, विशाल शिंदे, किरण कुंभार, पांडुरंग मोरे, सुदाम धोंगडे, महादेव लव्हारे, तारेख मोमीण आणि अंकुश वाघ यांनी स्वतः वर्गणी जमा करून धान्य खरेदी केले. गहू, तांदूळ, तूरडाळ, तेल असे साहित्य खरेदी करून 12 किलोचे कीट तयार केले आणि गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचे कार्य केले.